भारतभेट २०२० – Sudhir Kulkarni

आमच्या अमेरिकेतील उत्तरपूर्व भागातील वयस्क इथल्या तीव्र थंडी आणि बर्फापासून बचावासाठी ,जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात ,गरम प्रदेशातील फ्लॉरिडा किँवा अरिझोनामध्यें पलायन करतात.परंतु आम्ही त्या काळात मुंबईला  राहणे पसंत करतो कारण त्यावेळी  तिथली हवा आल्हाददायक असते. त्यामुळे ह्यावर्षी  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला प्रयाण करण्यासाठी आम्ही न्यू यॉर्कच्या JFK विमानतळावर अल्बनीहून गेलो. बाहेरच (Curbside) बॅगा चेककरून  गेटपाशी जाऊन बसलो.  विमानप्रवेशाआधी Delta च्या एजन्टने आमची कागदपत्रे -पासपोर्ट व OCI कार्ड -तपासली. माझ्या पत्नीचा-शीलाच्या OCI कार्डवर जुन्या पासपोर्टची नोंद होती पण तो काही वर्षांपूर्वी हरवलेला होता. आणि ह्यापूर्वीच्या तीनचार भारतभेटीत तो कोणी मागितला नव्हता. एजन्टने भारत सरकारचा नवा नियम दाखवून उद्या कॉन्सुलेटमधून  emergency  visa काढल्यानंतर  आम्ही जाऊ शकू असे सांगितले. अर्थात ह्यात आमचा दोष होता कारण प्रवासापूर्वी सर्व कागदपत्रे बरोबर आहेत ह्याची खात्री करणे जरुरीचे होते.    

त्यारात्री Manhattan मधील West Midtown भागातील एका हॊटेलमध्ये मुक्काम केला,नशिबाने बॅगा चेक केल्याने बरोबर फक्त हातातील सामान होते.व दुसऱ्या  दिवशी सुटीचा दिवस नव्हता.सकाळी उठून कॅबने Upper East च्या  भारतीय  कॉन्सुलेट मध्ये गेलो. तिथे कळले की  व्हिसासाठी त्यांनी Outsourcing केलेले आहे आणि त्यांचे ऑफिस Lower  West  भागात आहे. परत   कॅबने त्या पत्त्यावर गेलो. तो अर्ज कॉम्प्युटर वर भरायचा होता . परंतु क्लिष्ट होता जरी शीला त्या क्षेत्रातील होती तरी तिला त्यासाठी बराच वेळ खर्च करावा लागला–थोडक्यात User Friendly नव्हता! अर्जाच्या फी साठी  फक्त Money Order च -कॅश चालणार नव्हती .त्यासाठीही जवळपास  शोधाशोध करावी लागली. काही तासांनी त्या ऑफिसने आम्हाला एक सीलबंद लिफाफा दिला व  सांगितले कि तो अशाच असा -न  उघडता -कॉन्सुलेट मध्ये दिलात तर तुम्हाला अर्ध्या तासात Emergency व्हिसा मिळू शकेल. पुन्हा  आम्ही कॉन्सुलेटकडे कॅबने परतलो. तिथे एक तासाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी एकदा शीलाचा भारतीय व्हिसा हाती आला. आता ज्यांना Manhatten बेटा चा परिचय आहे त्यांना कळेल कि तिथे Upper East  कडून Lower West ला जायला व परत यायला वाहतुकीमुळे दरवेळी एक-एक तास सहज लागत होता. अशा स्थितीत आमच्या सारख्या वयस्कांचा त्रास वाचवण्यासाठी कॉन्सुलेटमध्येच व्हिसाची सोय करणे सरकारला  जरुरीचे आहे!   

एक दिवसाच्या उशिरा का होईना  दुसऱ्या दिवशी  आम्ही एकदाचे मुंबईला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी तिथे लागणाऱ्या खर्चासाठी  आमचे खाते असलेल्या जवळच्या खासगी बँकेत गेलो. यायच्या आधी अमेरिकेतून ह्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते. परंतु तिथे दुसरा धक्का बसला. गेल्या दोन वर्षात तुमचे KYC (Know Your Customer) झालेले नसल्याने ते झाल्याखेरीज तुम्हाला रुपये काढता येणार  नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शीलाबरोबर जाऊन KYC चे सोपस्कार पार पाडले आणि आम्हाला आमच्याच खात्यातून काढता आले. मी बँक कर्मचाऱ्यांना प्रश्न केला ,” विजय मल्ल्या तसेच निरव मोदी ह्यांचे KYC केले होते मग ते पळून कसे गेले? “अर्थात भारत सरकारकडे त्याचे उत्तर नाही तर ह्या कर्मचाऱ्यांकडे कसे असणार? हे कर्मचारी  त्यांना शिकवलेल्या नियमानुसार खातेदारांशी वागत होते.   भारतात दोन महिने राहणार असल्यामुळे आमच्या  Apple फोनमध्ये  भारतीय  सिम कार्ड घालण्यासाठी  Vodafoneच्या   दुकानात गेलो. त्यासाठी ह्यापूर्वी माझ्या मेहुणीच्या आधार कार्डचा उपयोग  करून सिमकार्ड विकत घेतले होते. ह्या वेळेस विचार केला कि तिला त्रास देण्यापेक्षा  आपले OCI कार्ड व पासपोर्टच्या जोरावर सिमकार्ड घेन्याचे ठरवले. आणि एका आठवड्यात तिसरा धक्का बसला. फोन कंपनीनुसार आम्ही परदेशी असल्यामुळे कोण,कुठले ह्याची चौकशी झाल्याशिवाय फ़ोन सुरळीत चालू व्हायला एक आठवडा लागला. Verification साठी आज येतो ,उद्या येतो असे करता करता शेवटी एकदाचा फोन कंपनीचा माणूस तब्बल ८ दिवसांनी उगवला. “आम्ही तेच आहोत”ह्याची खात्री करून घेतल्यावर फोन सेवा चालू झाली परंतु मधून मधून फोनवर बोलणे चालू असता मधेच बंद पडत होता. म्हणून मी ह्या सेवेचा “वेडाफोन” म्हणून उल्लेख करत असे.   

नोव्हेंबर २०१९ मध्ये अमेरिकेतून तिथल्या बँक खात्यातून भारतीय बँकेत पैसे ट्रान्सफर करायला फक्त ३ दिवस लागले. लॅपटॉपवरून मी भारतातून तसे करण्याचा प्रयत्न केला असता त्या website वर माझ्याकडे W२ किंवा  paystub ची मागणी केली.  मी सेवानिवृत्त असल्याने paystub चा प्रश्नच नव्हता. तसेच कोणी टॅक्सची कागदपत्रे घेऊन प्रवास करतात का ? त्यामुळे तिथे रुपये मिळविण्याचा तिसरा मार्ग म्हणजे  US बँकेचा चेक तिथल्या खात्यात जमा करणे. तेव्हा सांगण्यात आले कि त्याला २१ Working Days लागतील. प्रत्यक्षात २५ दिवस लागले कारण  Branch मधून आमचा चेक  हेडऑफिसला जायला आणखी चार दिवस लागले. ह्या संगणक आणि इंटरनेटच्या जमान्यात साधा चेक वटविण्यासाठी एव्हडा अवधी का लागावा? हा चौथा धक्का होता.  

मधल्या काळात ह्यावर उपाय म्हणजे ATM पैसे काढणे. परंतु  त्यामधून  एकावेळी फक्त १०००० रुपये काढण्याची मर्यादा तसेच  त्यातून प्रत्येक Withrawalला २००रु.  फी आकारात होते. म्हणजे प्रत्यक्षात ९८०० रु. हातात पडत होते. त्यामुळे मुंबईतील रोजचा खर्च आणि भारतातील प्रवासासाठी , कमी वेळा  ATM ,व जिथे शक्य असेल तिथे क्रेडिट कार्ड वापरून ,तसेच बरोबर नेलेल्या डॉलर्सचे रुपये करून ,उपयोगात आणले. .  

एव्हडे धक्के खाल्ल्यायावर आम्हाला असे वाटू लागले की इथले सुखाचे  आयुष्य सोडून अनंत अडचणींना तोंड द्यायला भारतात आपण कशाला जातो ? मग माझ्या मनात विचार आला :मुंबईतील दोन महिन्याच्या वास्तव्यात आपल्याला ज्या  गोष्टी करण्याचा आनंद मिळतो त्यासाठी अशा धक्क्यांकडे दुर्लक्ष  करणे जरूरीचे आहे; ऐन हिवाळ्यात कानटोपी,जॅकेट,व हातमोजे न  घालता सकाळ संध्याकाळ जवळच्या शिवाजी पार्कवर  फिरायला जाणे ,तिथल्या  कट्ट्यावर  मित्रांशी गप्पा मारणे, नातेवाईकांना भेटणे , मराठी नाटके/सिनेमे  बघणे, तसेच भारतातील प्रेक्षणीय स्थळांची टूर काढणे वगैरे गोष्टी  करता आल्या असत्या का?आपल्या आयुष्याच्या सायंकाळी जोपर्यंत पायात शक्ती आहे तोपर्यंतच   भारताचा प्रवास करणे शक्य होईल.   

वरील विचारांमुळे, जगातील कोरोना विषाणूचा संपूर्ण  नायनाट झाल्यावर , येत्या हिवाळ्यातील आगामी भारतभेटीचा कीडा  माझ्या मनात  वळवळू लागण्याची शक्यता आहे.  कारण मातृभूमीची ओढ नेहमीच असते !
                                                                                                                                           

-सुधीर शं . कुलकर्णी