चिखली छात्रालय भेट

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद ह्यांचे शिष्य स्वामी दयानंद सरस्वती (सन १९३० ते २०१५) ह्यांनी Saylorsburg, PA  येथे अर्षविद्या गुरूकुलम १९८६ मध्ये स्थापन केले. ते दरवर्षी उन्हाळ्यात भारतातून येऊन उत्तर अमेरिकेतील शिष्यांना मार्गदर्शन करत असत. बाकीचे महिने ते भारतात राहत असत. 

सुमारे २० वर्षांपूर्वी तामिळनाडू राज्यातील एक स्त्री त्यांच्याकडे तिची व्यथा घेऊन आली.  ती आडगावात शेतमजुर म्हणून काम करत होती. त्यामुळे तिच्या मुलाच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागली.तेंव्हा शिक्षण तसेच आरोग्य सुविधांपासून वंचित असणाऱ्या मुला-मुलींसाठी त्यांनी  भारतातील विविध राज्यात मोफत छात्रालये उघडण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी AIM ( All India Movement ) for SEVA ह्या सेवादायी संस्थेची स्थापना सन २००० मध्ये केली. ( अधीक माहितीसाठी www.aimforseva.org ). गेल्या १८ वर्षात संस्थेतर्फे भारतात अनेक छात्रालये (वसतीगृहे) उभी करण्यात आलेली आहेत. आणि त्यातील एक म्हणजे पुण्याजवळील चिखलीमधील छात्रालय. 

ह्या मुलांच्या छात्रालयाची इमारत उभारण्यात आपल्या गावातील Radiologist-Oncologist डॉ. अरुण पुराणिक व त्यांचे Sayer, PA  मधील Cardiologist मित्र डॉ. प्रमोद देशमुख ह्यांचा पुढाकार होता. दोघांची ओळख गुरुकुलममध्ये झाली व त्यांनी उदारहस्ते १ कोटी २० लाख रुपयांची देणगी दिल्याने आज जवळजवळ ४० मुले ह्या छात्रालयाचा लाभ घेत आहेत. आपल्या Albany, NY भागात छात्रालयाच्या मदत फंडासाठी दरवर्षी जूनमध्ये ५ K शर्यत. यंदा ही शर्यत येत्या 15 जून ला आयोजीत करण्यात आली आहे ( अधीक माहितीसाठी www.goodkarma5K.itsyourrace.com ) तर सप्टेंबरमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आखण्यात येतो. २०१७ साली AimforSEVA अल्बनी  शाखेतर्फे भारतातील एकंदर ४५ मुलांचा वार्षिक खर्च पेलण्याची जबाबदारी घेतली आहे. 

२०१८च्या भारतवारीमध्ये चिखलीला जाऊन तेथील छात्रालयाला भेट देण्याचे ठरवले. पुण्याला नातेवाईकांना भेटून मुंबईला परत येताना वाटेतील निगडीजवळील चिखलीला २१ जानेवारीला थांबलो. छात्रालयाचे प्रमुख श्री.मच्छिन्द्रनाथ बुचुडे ह्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी सुचविले की मुलांशी गप्पागोष्टी करायच्या असतील तर रविवार दुपार ही  त्यांच्या दृष्टीने सोईस्कर ठरेल. आमची Uber छात्रालयाच्या प्रवेशद्वारातून शिरताना एक मुलगा माझ्याशी हिंदीत बोलायला लागला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आता हिंदी ऐकू येते परंतु ह्या छात्रालयातील विद्यार्थ्यांकडून मी मराठीची अपेक्षा केली होती. तेव्हा मी त्याला विचारले “तुला मराठी येते ना?” त्याने होय म्हंटल्यावर मी त्याला प्रेमाने उपदेश केला , “अरे मग मराठीत बोलायचे!”.  

माझी पत्नी शीला व माझे, श्री.बुचुडे ह्यांनी स्वागत करून आम्हाला त्यांनी छात्रालयाच्या पहिल्या मजल्यावरील   हॉलमध्ये नेले. आम्ही बसलो त्या समोरच्या भिंतीजवळ देवादिकांच्या मूर्त्या होत्या –छोटे देवालय उभे केले होते. बाजूला स्वामी दयानंद सरस्वतींचा फोटोही पाहायला मिळाला. श्री. बुचुडेंनी मुले जमण्याआधी माहिती दिली कि वयाच्या १०व्या वर्षी–म्हणजेच इयत्ता ५वि मध्ये विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो. व नंतर तो त्याच्या  १० वीच्या परीक्षेपर्यंत इथे राहतो. इथली मुले बाजूच्या नाटेकर विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या मुलींबरोबर एकत्र त्या शाळेत शिकतात. मात्र छात्रालयात मुलींना प्रवेश नाही. त्या दिवशी आम्ही आल्याने छात्रालयातील ४० मुले व नाटेकर वसतिगृहातील १० मुली एकत्र जमले. 

स्वागताच्या भाषणासाठी श्री. बुचुडे ह्यांनी तेथील ९वीचा एक विद्यार्थी –प्रथमेश सोनावणे -ह्या चुणचुणीत मुलाला  निवडले. त्यांची निवड योग्य होती हे त्याच्या उस्फुर्त भाषणावरून समजले. येणारे पाहुणे अमेरिकेत राहतात असे त्याला सांगण्यात आले होते. त्यामुळे तो जेव्हा आम्हाला प्रवेशद्वाराजवळ भेटला तेव्हा त्याला आमच्याशी कोणत्या भाषेत बोलायचे असा प्रश्न पडला. खेडेगावातून आल्याने त्याला इंग्लिश एवढे  बोलता येत नव्हते त्यामुळे त्याने साहजिकच राष्ट्रभाषेचा आधार घेण्याचे ठरविले. त्या गोष्टीचा उल्लेख करून तो म्हणाला,” ह्या आजोबांनी मला समजावले की आपण मराठीत बोलले पाहिजे. इतकी वर्षे अमेरिकेत राहून त्यांना आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे हे त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे !” नंतर तो आपल्या भाषणांत  पुढे म्हणाला ,” ह्या छात्रालयात इतर मुलांबरोबर मलाही, तुमच्या सारख्या देणगीदारांमुळे शिक्षणाची संधी मिळत आहे ह्याबद्दल आभार मानावे तितके थोडेच!”. नंतर मुला -मुलींनी पेटी व ढोलकाच्या साथीने सामूहिक प्रार्थना म्हणून दाखवली तसेच कविता, अभंग,व शिवाजीचा पोवाडा गाऊन काही मुला-मुलींनी आपली कला आमच्यासमोर सादर केली.

समोर बसलेल्या मुला-मुलींना आम्ही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. गावाचे नाव विचारले असता बरीचशी मुले ही मराठवाडा, विदर्भ ह्यातील दुष्काळी भागातून  आल्याचे लक्षात आले. शाळेत जाण्यासाठी किती किलोमीटर चालावे लागत होते असे विचारता सरासरी एकेरी अंतर ६ किमी म्हणजेच रोज १२ किमीची पायपीट करावी लागत होती असे उत्तर ऐकायला मिळाले. बहुसंख्य मुलांचे पालक हे अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजुरीवर गुजराण करत होते हे त्यांनी सांगितलेल्या माहितीवरून समजले. आडगावी किंवा दुर्गम भागातील काही मुलांना शिक्षणासाठी अशा छात्रालयात पाठवण्याखेरीज पालकांना गत्यंतर  नव्हते हे लक्षात आले. मी मुंबईसारख्या महानगरात वाढल्याने अशी मुले शिक्षणापासून वंचित असतात ह्याची त्यांच्याबरोबर झालेल्या संवादावरून मला जाणीव झाली. 

आपण इथून पाठवलेली आर्थिक मदत सार्थकी लागत आहे हे प्रत्यक्ष बघितल्यावर समाधान वाटले. आणि आमचा खारीचा वाट वाढविण्याचा निश्चय चिखलीहून मुंबईला परतताना केला!

सुघीर कुलकर्णी
sudhirs.kulkarni@gmail.com 
sukul1@yahoo.com